Cricket in Olympic : लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश? मुंबईत होणार घोषणा

चीनमध्ये नुकत्याच आयोजित हांगझाऊ एशियाडनंतर आता २०२८ सालच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या यजमान समितीच्या निर्णयाची घोषणा रविवारी मुंबईत होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकांचं सत्र १२ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत होत आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात याआधी १९०० साली क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्या ऑलिम्पिकमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स संघांमध्ये क्रिकेटचा एकमेव सामना खेळवण्यात आला होता. तो जिंकून इंग्लंडनं क्रिकेटचं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या यजमान समितीकडून ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटची शिफारस करण्यात आली असल्याचं समजतं.