India Vs Australia World Cup 2023 : भारताची विजयी सलामी, ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी विजय

रोहित शर्माच्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी पराभव करून, वन डे विश्वचषकात विजयी सलामी दिली. चेन्नईतल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी २०० धावांचंच आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था दोन षटकांत तीन बाद दोन धावा अशी केविलवाणी झाली होती. त्या परिस्थितीत विराट कोहली आणि लोकेश राहुलनं रचलेल्या १६५ धावांच्या झुंजार भागिदारीनं भारताला विजय मिळवून दिला. विराटनं ११६ चेंडूंत सहा चौकारांसह ८५ धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं ११५ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ९७ धावांची खेळी केली. त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव १९९ धावांत गुंडाळला. भारताकडून रवींद्र जाडेजानं तीन, तर जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. रवीचंद्रन आश्विन, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या या तिघांनीही प्रत्येकी एक विकेट काढली.